Pages

Monday 5 December 2016

अमेरिकन जेवण

मी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीबरोबर अमेरिकेत काम करीत असताना तेथील प्रोजेक्ट मॅनेजरने आम्हा सर्व कंन्सल्टंटसना जेवायला घरी बोलाविले. तो गुरुवार होता. सकाळीच प्रोजेक्ट मॅनेजरने मी Veg आहे काय याची चौकशी केली. मी सर्वकाही खातो, कोठल्याही प्रकारचे मांस मला वर्ज्य नसल्याचे त्याला सांगितले.
Image result for dinnerसंध्याकाळी काम संपवून आम्ही सर्व त्या मॅनेजरच्या घरी गेलो. त्याने त्याचे घर दाखविले. नंतर आम्ही जेवणाच्या टेबलावर आलो. घरात बूट घालून जेवण करणे हेच मला कसेतरी वाटत होते. जेवणाच्या आधी सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून प्रार्थना केली. ती ही अर्थात बूट घालूनच. नंतर मला प्रोजेक्ट मॅनेजरच्या पत्नीने सांगितले की तिने माझ्यासाठी veg जेवण केले आहे. मी परत सांगितले की मी सर्व प्रकारचे मांस आवडीने खातो. परंतु ते तिला पटले नाही. तिने कोठलेही non-veg पदार्थ मला वाढण्यास चक्क नकार दिला. मला बाटविण्याची तिची इच्छा नसल्याचे तिने आवर्जून सांगितले. 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणत समोर दिसणाऱ्या चमचमीत पदार्थांकडे मी फक्त आशाळभूतपाने पहात राहिलो. माझ्यासाठी कोर्नसूप बनविले असल्याचे तिने सांगितले. नंतर त्या कोर्न सूप वरील झाकण उघडून त्यातून तिने मोठा चिकन लेग बाहेर काढला. केवळ कोर्नसूपला स्वाद येणार नाही म्हणून तिने तो स्वादासाठी त्यात टाकल्याचे स्पष्टीकरण दिले. परंतु तो मला देणार नसल्याचेही सांगितले. या प्रकाराने मी हतबुद्ध झालो. जर एखादा खरोखरच शाकाहारी माणूस तेथे असता तर त्याने काय केले असते हा विचार मनात आला. हा माझा अमेरिकन माणसाच्या घरी जेवणाचा (veg का non-veg??) पहिला अनुभव !

1 comment: