Pages

Friday 9 December 2016

मी आजारी पडतो

परदेशी भटकंती करीत काम करताना आरोग्य सांभाळणे हे महत्वाचे असते. जर आजारी पडलात तर तुमची काळजी घेणारे कोणीच नसते. तसेच संस्कृती दरी जाणवते. त्यातही तुम्ही इंग्रजी न समजणाऱ्या देशात असाल तर बघायलाच नको. मला याचा अनुभव आला.
मी माझ्या आरोग्याची अतीव काळजी घेत होतो. पण चीनमध्ये  शेंझान शहरात एका प्रोजेक्टवर असताना माझे तोंड आले. खरे तर 'तोंड येणे' ही माझी नेहमीची समस्या होती. यावरील उपायही मला माहित होता. बी व्हिटामिनची गोळी घेतल्यास तोंड येणे बरे होते. मी निश्चिंत होतो.
पण यावेळी मी चीनमध्ये होतो. चीनमध्ये पाश्चात्य औषधे वापरत नाहीत. तेथे फक्त पारंपारिक चीनी औषधेच मिळतात. Hong Kong अनेक वर्षे ब्रिटीश अधिपत्याखाली असूनही तेथेही हीच परिस्थिती आहे. आपण मात्र आपल्या आयुर्वेदाला विसरलो आणि अॅलोपथीला जवळ केले.
चीनी पारंपारिक औषधे म्हणजे प्राण्यांच्या अवयवापासून बनविलेली औषधे. चीनमध्ये बहुतांश लोकांना इंग्रजी भाषेचा गंधही नसतो. त्यामुळे मला बी व्हिटामिन हवे आहे हे कसे सांगायचे हा प्रश्न होता. थोडा विचार करता यावर उपाय सापडला. मी एका अमेरिकन हॉटेलमध्ये रहात होतो. तेथील बहुतांश  पर्यटक परदेशी होते. हॉटेलमॅनेजरला थोडेफार इंग्रजी येत होते. त्याच्या सहाय्याने बी व्हिटामिनच्या गोळ्या आणण्याचे ठरविले.
रविवार होता. मी त्या हॉटेलमॅनेजरशी बोललो. मला काय आणि कशासाठी हवे आहे ते त्याला समजावून सांगण्यासाठी सुमारे पाऊण तास लागला. नंतर त्याने माझ्याबरोबर एका हॉटेल कर्मचाऱ्याला पाठविले. मला काय हवे आहे ते त्याला त्या मॅनेजरने मँडरीनमध्ये (चीनी भाषा) समजावून दिले. त्या कर्मचाऱ्याला इंग्रजीचा गंधही नव्हता. या कर्मचाऱ्याने मला एका चीनी औषधांच्या दुकानात नेले. अनेक औषधींच्या वासाने दुकान भरले होते (आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या दवाखान्यासारखे). दुकानातील माणसाने मला एक औषधी गोळ्यांची बाटली दिली.  मला B व्हिटामिन हवे होते. बाटलीवर किमान इंग्रजीतील 'B' दिसावे अशी माझी रास्त अपेक्षा होती. पण त्यावर एकाही अक्षर इंग्रजीत नव्हते. पण मला त्यावर एक माशाचे चित्र दिसले. त्यावरून मी निष्कर्ष काढला की ते औषध 'बी व्हिटामिन' नसून 'इ व्हिटामिन' आहे. ती औषधाची बाटली मी हॉटेलला गेल्यावर हॉटेलमॅनेजरला दाखविली आणि परत मला काय हवे आहे ते सांगितले. ती बाटली खरोखर ई व्हिटामिनचीच होती. मला त्याच हॉटेल कर्मचाऱ्याबरोबर त्याने परत पाठविले. त्या दुकानदाराने आता मला बाटली बदलून दिली. त्या बाटलीवरही कोठले इंग्रजी अक्षर नव्हते. आता माझा विश्वास उडाला होता. मी ती बाटली तशीच ठेवली. दुसऱ्या दिवशी ती बाटली कामावर घेऊन गेलो. तेथील माझ्या चीनी मित्रांकडून ते बी व्हिटामिन असल्याची खातरजमा केली आणि मगच ते घेण्यास सुरुवात केली.

No comments:

Post a Comment