Pages

Tuesday 6 December 2016

चीनी कोंबडी

१९९७ ची गोष्ट. मी चीनमध्ये एका प्रोजेक्टवर होतो. माझ्या दुबईतील कंपनीतून मला फोन आला की आणखी एक भारतीय त्या प्रोजेक्टवर येत आहे. त्याला settle होण्यास मी मदत करावी. मी आनंदाने ती जबाबदारी स्वीकारली.
हा माझा सहकारी एका रविवारी दुपारी तेथे दाखल झाला. संध्याकाळी आम्ही दोघांनी बाहेर जेवायला जाण्याचे ठरविले. जवळच एक मोठे इंडोनेशियन रेस्टॉरंट होते. तेथे आम्ही सर्व कन्सलटंट्स नेहमी जात होतो. तेथेच त्याला न्यायचे ठरविले.
पण आमचा हा सहकारी भलताच उतावळा निघाला. त्या इंडोनेशियन रेस्टॉरंटमध्ये जाण्याएवढाही त्याला धीर नव्हता. त्याला प्रवासातून आल्याने खूप भूक लागली होती. त्याने वाटेत रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा आग्रह धरला. त्या रेस्टॉरंटमध्ये कोणालाही भाषा कळणार नाही, Order देताना कठीण जाईल असे सांगूनही त्याला पटले नाही. जगात कोठेही 'चिकन' म्हटले की कळते यावर त्याचा विश्वास होता. त्याच्या आग्रहाने आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये शिरलो.
या मित्राने अत्यंत आत्मविश्वासाने चिकनची ऑर्डर दिली. पण रेस्टॉरंट मालकाला 'चिकन' हा काय प्रकार आहे हे कळले नाही. माझ्या मित्राने हात फडफडवून 'कुकूच कू' म्हणून पाहिले तरी त्या रेस्टॉरंट मालकाला काही कळले नाही (प्रत्येक देशात प्राण्यांचे आवाज वेगळे ऐकू येतात !). आता काय करावे हा आम्हाला प्रश्न पडला. हा मित्र तर भुकेने कासावीस झाला होता.
रेस्टॉरंटमध्ये शिरताना आम्ही दाराशीच प्राण्यांचे पिंजरे पहिले होते. साप, नाग, मुंगुस, मोरापासून सर्व प्राणी त्या पिंजऱ्यांत होते. आपल्याला कोणत्याही प्राण्याची ऑर्डर द्यायची असल्यास पिंजऱ्यातील ते प्राणी शिजवून देतात. ही पद्धत चीनमध्ये सर्वत्र आहे. या प्राण्यांत कोंबडीही होती हे आमच्या चाणाक्ष नजरेने हेरले होते. आम्ही बाहेर जाऊन ती कोंबडी रेस्टॉरंटमालकाला दाखविली. पण आम्हाला पूर्ण कोंबडी नको तर अर्धीच हवी (आमच्या हॉटेल खोलीत फ्रीज नव्हता) हेही त्या मालकाला खुणेने सांगितले.
बराच वेळ वाट बघूनही चिकन येत नव्हती. हा मित्र भुकेने कासावीस झाला होता. तेवढ्यात मालकाचा मुलगा आला. तो शाळेत नववीत शिकत होता. त्याला शाळेत English हा विषय होता. त्याला English बोलण्याची संधी मिळावी म्हणून मालकाने मुद्दाम घरून बोलाविले होते. त्याच्या सहाय्याने आम्ही अन्य काही पदार्थांची ऑर्डर दिली आणि या मित्राची भूक थोडीफार शांत केली. बऱ्याच वेळाने आम्ही ऑर्डर दिलेली कोंबडी आली. संपूर्ण कोंबडी केवळ वाफवून दिली होती आणि त्यावर कोंबडीचे वाफवलेले डोके लावून आणली होती. या वेळपर्यंत आमची भूकही अन्य पदार्थांनी  आम्ही भागविली होती. ही वाफाविलेली कोंबडी आम्ही थोडी खाऊन बाकी तशीच ठेऊन तेथून निघालो. माझ्या या मित्राने परत कधीही अशा छोट्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा आग्रह धरला नाही.

No comments:

Post a Comment