Pages

Monday 16 January 2017

माझी कार हरवते.....

अमेरिकेत मी Compaq Computers या नामांकित कंपनीत प्रोजेक्टवर होतो. ह्युस्टन शहरात या कंपनीचे मुख्य कार्यालय होते. कंपनीचे आवार म्हणजे गावच होते. तेथे दहा माजली दहा कार्यालयीन इमारती असून प्रत्येक दोन  इमारतीच्यामध्ये एक दहा मजली कार पार्किंग इमारत आहे. आणि या सर्व इमारती पहिल्या मजल्यावरून
एकमेकींशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी तेथे कार पार्क करताना दडपण आले होते. परत जाताना आपली कार मिळेल का नाही याची धास्ती होती. पार्किंग नंतर मी प्रथम बिल्डींगचा नंबर लक्षात ठेवला. नंतर कोठल्या मजल्यावर कार आहे तेही लिफ्टमध्ये शिरताना लक्षात ठेवले. संध्याकाळी कंपनी सुटल्यावर त्या बिल्डींगमध्ये कर घेण्यास गेलो. लिफ्टने त्या मजल्यावर आलो. पण माझी कार दिसेना. बिल्डींग नंबर आणि मजला परत परत चेक केला. तो तर बरोबर होता. प्रत्येक मजला प्रचंड मोठा होता. मी सगळीकडे जाऊन वेड्यासारखी कार शोधत होतो. शेवटी बिल्डीन्ग्च्या सिक्युरिटीकडे तक्रार देण्यास गेलो. त्याने विचारले 'कोठला मजला?' मी सांगितले '2'. त्याने परत विचारले '2 or L2?'. एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी लिफ्टमध्ये सकाळी शिरताना मजला पहिला होता, त्यावर L2 लिहिले होते. मी फक्त 2 लक्षात ठेवले. या इमारतीला जमिनीखाली मजले आहेत हे लक्षातच आले नव्हते. मी जमिनीखालील दुसऱ्या मजल्यावर माझी कार ठेवली होती आणि दुसऱ्या मजल्यावर शोधत होतो. L2 मजल्यावर माझी कार सुरक्षित होती. पण जवळपास एक तास मी दुसऱ्या मजल्यावर ती शोधात होतो. ही चूक अनेकांची होत असावी आणि तो सिक्युरिटी अनुभवी असावा म्हणूनच त्याने पहिल्या प्रश्नातच माझा गोंधळ दूर केला.