Pages

Thursday 29 December 2016

वाईन चे कारंजे आणि नव्या सहस्त्रकाचे स्वागत

एक जानेवारी २००० : नव्या सहस्त्रकाची सुरुवात. सर्व जग या सहस्त्रकाच्या स्वागतासाठी सज्ज होते. पूर्वेकडील देशांत या सहस्त्रकाची सुरुवात होणार असल्याने अनेक पाश्चात्य देशातील नागरिकांनी पोर्वेकडील देशांकडे धाव घेतली होती. मी मात्र सुदैवाने माझ्या प्रोजेक्टसाठी पूर्वेकडील हॉंगकॉंग या देशातच होतो.
आम्ही तेथील एका पंचतारांकित हॉटेलात कंपनीच्या खर्चाने काही महिने राहत होतो. तेथील विद्युत पुरवठा कंपनीमध्ये SAP चालू करायचे होते आणि त्यासाठी मी तेथे गेलो होतो. एक जानेवारीलाच तेथे SAP ची सुरुवात होनार होती.
१९९९ चा ख्रिसमस चालू झाला. Hong Kong मध्ये पर्यटकांची गर्दी उसळली होती. प्रत्येक हॉटेल आपल्याकडे जास्तीतजास्त पर्यटक ओढण्याचा प्रयत्न करीत होते. आमच्या हॉटेलने छान शक्कल लढविली.
३१ डिसेंबरच्या रात्री पार्टीमध्ये हॉटेल समोरील कारंज्यात पाण्याऐवजी वाईन भरण्याची घोषणा केली. रात्री प्रत्येकाने वाईनच्या कारंज्यातून हवी तेवढी वाईन घेईन प्यावी. या पार्टीसाठी गलेलठ्ठ तिकीट आकारलेले होते. पण आम्हाला (अनेक महिने त्या हॉटेलमध्ये राहत असल्याने) त्या पार्टीचे मोफत पासेस दिले होते. आम्ही या वाईन कारंज्याचे स्वप्न रोज बघत होतो.
३१ दिसेम्बाराचा दिवस आला. एक तारखेला SAP चे Go-Live होते. संगणक प्रणालीत Y2K मुळे गोंधळ झाल्यास संपूर्ण Hong Kong चे लाईट जाण्याचा आणि परदेशी पर्यटकांच्या उत्साहावर पाणी पडण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्हाला  जोपर्यंत SAP पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तो पर्यंत कंपनीतच थांबण्यास सांगण्यात आले. आम्ही सतत घड्याळाकडे बघत होतो. रात्री बारा वाजता बाहेर काय धमाल चालू असेल याची केवळ कल्पना करीत होतो. हॉटेलमधील वाईनचे कारंजे आमच्या डोळ्यासमोर थुई थुई नाचत होते. SAP कार्यान्वित होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास सकाळचे सात वाजले. आम्ही हॉटेलवर गेलो तेव्हा पार्टी संपली होती. युरोपमध्ये नव्या वर्षाची सुरुवात होत होती ते TV वर दाखवीत होते. TV बघत स्वत:चे समाधान करून घेतले.

Monday 12 December 2016

चक्रीवादळ भाग 2

 1999 सालचा ऑगस्ट महिना. Hong Kong मध्ये चक्रीवादळ आले होते. माझे विमान त्या वादळातून सुखरूप उतरले, पण मागचे विमान अपघातग्रस्त झाले हे माझ्या मागच्या पोस्टवर टाकले आहे.
मी त्या वादळातून हॉटेलवर पोचलो. दमलो होतो. बातम्या न बघताच झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी कंपनीत कामाला जायचे होते. सुट्टीवरून आल्याने मधल्या काळात काय काम झाले हेही जाणून घ्यायचे होते. मी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यास निघालो. मी मेट्रोने जात असे. मेट्रोचे भूमिगत स्टेशन मी रहात असलेल्या हॉटेलच्या खालीच होते. मेट्रोत फारशी गर्दी नव्हती. मी कंपनीत पोचलो. बराच वेळ झाला तरी कंपनीत मी एकटाच होतो. ते एका मोठ्या वीज कंपनीचे वेअरहाउस होते. तरी त्यात सिक्युरिटीशिवाय एकाही माणूस आलेला नव्हता. मला आश्चर्य वाटले. माझ्या सुट्टीच्या काळात काय काम झाले आहे ते समजल्याशिवाय मला माझ्या कामाला हात घालता येत नव्हता.
मग वेळ घालविण्यासाठी इंटरनेटवर बातम्या पाहू लागलो. ते Hong Kong च्या इतिहासातील सर्वात मोठे चक्रीवादळ असून दहा नम्बरचा धोक्याचा इशारा दिला आहे असे समजले. मात्र हा दहा नम्बरचा इशारा हे काय प्रकरण आहे ते कळले नाही. लहान असताना रेडिओवर 'मच्छीमारांसाठी इशारा' म्हणून असे सहा नंबर, सात नंबरचे बावटे लावल्याचे सांगत असत. पण त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काही संबंध असेल असे वाटले नव्हते. Hong Kong च्या त्या प्रोजेक्टमधील माझ्या टीममधील भारतीय वंशाच्या सहकाऱ्याला फोन लावला. त्याने या दहा नंबर इशाऱ्याचा अर्थ सांगितला. वादळाच्या तीव्रतेचे रेटिंग एक ते दहा असे केलेले असते. दहा नम्बरचा इशारा म्हणजे सर्वात धोकादायक वादळ. आठ ते दहा नंबरचा इशारा असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडायचे नसते. या वेळी तुम्ही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर पडून अपघात झाल्यास विमाकंपन्या भरपाई देत नाहीत. म्हणूनच आमच्या कंपनीत कोणीही कामावर आलेले नव्हते. आश्चर्य म्हणजे सार्वजनिक वाहतूक (मेट्रो, बसेस) चालू होती. मी कंपनीत आलोच होतो तर संध्याकाळपर्यंत थांबण्याचे ठरविले. कंपनीचे कॅन्टीन चालू होते.
संध्याकाळी घरी गेल्यावर बातम्या पाहू लागलो. या चक्रीवादळाचे केंद्र आता Hong Kong वर आले होते. घराबाहेर न पडण्याचे इशारे दिले जात होते. दुसऱ्या दिवशी हीच परिस्थिती कायम होती. त्या वादळात चक्रीवादळाचे केंद्र Hong Kong वर जवळपास चोवीस तास स्थिरावलेले होते. एकाच ठिकाणी वादळाचे केंद्र स्थिरावणे ही सहसा न घडणारी घटना होती.
मग माझ्यातील साहसीवृत्ती जागृत झाली. समुद्रकिनाऱ्यावर खूप मोठ्या लाटा येत असल्याचे TV वर दाखवीत होते. काही साहसी वीर ते बघण्यास गेल्याचेही दाखवीत होते. Hong Kong च्या चौपाटीजवळ मेट्रो स्टेशनही होते. मी माझ्या मित्रमंडळीना फोन करून माझा इरादा सांगितला आणि माझ्याबरोबर येण्यास कोण तराय आहे काय याची विचारणा केली. पण कोणीही तयार झाले नाही. मग मी माझाही बेत रद्द केला.
चक्रीवादळ हॉटेलच्या खोलीबाहेर घोंघावत होते. मी तेविसाव्या मजल्यावर रहात होतो. रस्त्यावरील कचरा वाऱ्याबरोबर उडत माझ्या खिडकीसमोर येत होता.
मी हॉटेल बाहेर पडून वादळाचा अनुभव घ्यायचे ठरविले. असा अनुभव मुंबईत कसा मिळणार? चाक्रीवादालासाम्बंधी एक इशारा वारंवार दिला जात होता. चक्रीवादळाचे केंद्र Hong Kong वर आहे. त्यामुळे काही काळ वादळ शमल्यासारखे वाटेल, वारा पूर्णपणे पडेल, पण थोड्याच वेळात वर विरुद्ध दिशेने जोरात वाहू लागेल. या गोष्टीचा प्रत्यय हॉटेलबाहेर पडल्यावर आला. हॉटेलबाहेरील रस्त्याची वाताहात झाली होती, अनेक झाडे पडली होती, रस्त्यावरील दुकानांच्या पाट्या खाली पडल्या होत्या. तेथे दुकानांच्या पाट्या रस्त्याला आडव्या लावतात (आपल्याकडे रस्त्याला समांतर असतात). त्यामुळे त्या डोक्यावर पडण्याचा धोका वाटत होता म्हणून रस्त्यावर जास्त न रेंगाळता हॉटेलमध्ये परत आलो.
दुसऱ्या दिवशी वादळ शमले. जनजीवन पूर्ववत झाले. माझ्या गाठीला एक अविस्मरणीय अनुभव आला.

Friday 9 December 2016

चक्रीवादळ भाग १

1999सालच्या ऑगस्ट महिन्यातील गोष्ट. मी Hong Kong मध्ये काम करीत होतो. Hong Kong चा नवा विमानतळ सुरु होऊन पाच-सहा महिने झाले होते. हा विमानतळ डोंगराच्या कुशीत आहे. त्यामुळे तेथे वारे खूप वहातात आणि त्यांची दिशाही बदलत असते.
मी भारतात कुटुंबियांना भेटण्यासाठी आलो होतो आणि परतीच्या प्रवासास मुंबईहून निघालो होतो. आमच्या कंपनीचे प्रमुख मला मुंबई विमानतळावर भेटले.त्यांचे आई-वडील मुंबईत होते, त्यांना भेटून  तेही त्याच फ्लाईटने जात होते. पण आमची बसण्याची जागा एकमेकांपासून दूर होती.
आमचे विमान प्रथम बँकोकला थांबून नंतर Hing Kong ला जाणार होते. बँकोक विमानातळावरच आम्हाला समजले की Hong Kong येथे मोठे चक्रीवादळ आले असून त्यामुळे आमचे उड्डाण उशिराने होईल. आम्हाला काही तास तेथे थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर आम्ही Hong Kong ला रवाना झालो.
मी तसा झोपाळूच. विमान आकाशात झेपावण्याआधीच मी झोपावालेला असतो आणि विमान जमिनीवर उतरल्यावर जो हलकासा धक्का बसतो त्यानेच परत जागा होतो. तसाच त्याही दिवशी मी गाढ झोपून गेलो. झोपेतच मला मी एखाद्या हिंदोळ्यावर झुलतो आहे असा भास होऊ लागला. विमान खाली उतरून परत आकाशात झेपावते आहे असेही लक्षात आले. डोळे उघडून पाहता विमान वादळात अडकून बोटीसारखे गदागदा हलत आहे हे लक्षात आले. वैमानिक विमानतळावर विमान उतरविण्याचा परत परत प्रयत्न करीत होता, पण वादळामुळे त्याला ते शक्य होत नव्हते हे ही लक्षात आले. विमानात अत्यंत तणावपूर्ण वातावरण होते. मी एकंदरीत अंदाज घेतला आणि विमान उतरण्यास अजून काही वेळ लागेल हे ओळखून परत निद्रेच्या अधीन झालो. थोड्या वेळात हलक्याश्या धक्क्याने जाग आली. विमान उतरविण्यात आमचा वैमानिक यशस्वी झाला होता. सर्व प्रवाशांनी टाळ्या वाजविल्या. माझ्या बाजूला बसलेल्या प्रवाशाने विमान कसे वादळात अडकले होते हे मला सांगितले आणि मी कसा गाढ झोपलो होतो याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. मी त्याला सांगितले की 'विमान वादळात अडकले होते ते मला कळले होते, पण सर्व काही वैमानिकाच्या हातात होते, मी काहीच करू शकत नव्हतो म्हणून मी परत शांतपणे झोपून गेलो'. तो प्रवासी माझ्याकडे वेड्यासारखा पाहू लागला.
आम्ही विमानतळावर उतरलो आणि लगेचच विमानातळावरील वीज गेली. सुमारे अर्धा तास आम्ही बॅग
पट्ट्याजवळ वीज येण्याची वाट बघत उभे होतो. विमानातळाबाहेर पडताना आगीचे बंब आणि रुग्णवाहिकांचा ताफा विमानतळाजाताना पहिला. नंतर कळले की आमच्या मागून येणारे (आमच्या नंतर तीन मिनिटांनी उतरलेले)  विमान उतरताना त्याचा पंख जमिनीला लागल्याने तुटला आणि ते विमान वरची बाजू खाली अशा स्थितीत उतरले. या अपघातात एका महिलेचे निधन झाल्याचेही समजले. Hong Kong च्या नव्या विमानतळावरील तो पहिला अपघात. मी हॉटेलला पोचल्याबरोबर घरी फोन केला होता (तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता), त्यामुळे नंतर TV वर बातमी बघूनही घरच्याना चिंता वाटली नाही.
अपघात संदर्भ : https://aviation-safety.net/database/record.php?id=19990822-0
अपघात व्हिदिओ

मी आजारी पडतो

परदेशी भटकंती करीत काम करताना आरोग्य सांभाळणे हे महत्वाचे असते. जर आजारी पडलात तर तुमची काळजी घेणारे कोणीच नसते. तसेच संस्कृती दरी जाणवते. त्यातही तुम्ही इंग्रजी न समजणाऱ्या देशात असाल तर बघायलाच नको. मला याचा अनुभव आला.
मी माझ्या आरोग्याची अतीव काळजी घेत होतो. पण चीनमध्ये  शेंझान शहरात एका प्रोजेक्टवर असताना माझे तोंड आले. खरे तर 'तोंड येणे' ही माझी नेहमीची समस्या होती. यावरील उपायही मला माहित होता. बी व्हिटामिनची गोळी घेतल्यास तोंड येणे बरे होते. मी निश्चिंत होतो.
पण यावेळी मी चीनमध्ये होतो. चीनमध्ये पाश्चात्य औषधे वापरत नाहीत. तेथे फक्त पारंपारिक चीनी औषधेच मिळतात. Hong Kong अनेक वर्षे ब्रिटीश अधिपत्याखाली असूनही तेथेही हीच परिस्थिती आहे. आपण मात्र आपल्या आयुर्वेदाला विसरलो आणि अॅलोपथीला जवळ केले.
चीनी पारंपारिक औषधे म्हणजे प्राण्यांच्या अवयवापासून बनविलेली औषधे. चीनमध्ये बहुतांश लोकांना इंग्रजी भाषेचा गंधही नसतो. त्यामुळे मला बी व्हिटामिन हवे आहे हे कसे सांगायचे हा प्रश्न होता. थोडा विचार करता यावर उपाय सापडला. मी एका अमेरिकन हॉटेलमध्ये रहात होतो. तेथील बहुतांश  पर्यटक परदेशी होते. हॉटेलमॅनेजरला थोडेफार इंग्रजी येत होते. त्याच्या सहाय्याने बी व्हिटामिनच्या गोळ्या आणण्याचे ठरविले.
रविवार होता. मी त्या हॉटेलमॅनेजरशी बोललो. मला काय आणि कशासाठी हवे आहे ते त्याला समजावून सांगण्यासाठी सुमारे पाऊण तास लागला. नंतर त्याने माझ्याबरोबर एका हॉटेल कर्मचाऱ्याला पाठविले. मला काय हवे आहे ते त्याला त्या मॅनेजरने मँडरीनमध्ये (चीनी भाषा) समजावून दिले. त्या कर्मचाऱ्याला इंग्रजीचा गंधही नव्हता. या कर्मचाऱ्याने मला एका चीनी औषधांच्या दुकानात नेले. अनेक औषधींच्या वासाने दुकान भरले होते (आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या दवाखान्यासारखे). दुकानातील माणसाने मला एक औषधी गोळ्यांची बाटली दिली.  मला B व्हिटामिन हवे होते. बाटलीवर किमान इंग्रजीतील 'B' दिसावे अशी माझी रास्त अपेक्षा होती. पण त्यावर एकाही अक्षर इंग्रजीत नव्हते. पण मला त्यावर एक माशाचे चित्र दिसले. त्यावरून मी निष्कर्ष काढला की ते औषध 'बी व्हिटामिन' नसून 'इ व्हिटामिन' आहे. ती औषधाची बाटली मी हॉटेलला गेल्यावर हॉटेलमॅनेजरला दाखविली आणि परत मला काय हवे आहे ते सांगितले. ती बाटली खरोखर ई व्हिटामिनचीच होती. मला त्याच हॉटेल कर्मचाऱ्याबरोबर त्याने परत पाठविले. त्या दुकानदाराने आता मला बाटली बदलून दिली. त्या बाटलीवरही कोठले इंग्रजी अक्षर नव्हते. आता माझा विश्वास उडाला होता. मी ती बाटली तशीच ठेवली. दुसऱ्या दिवशी ती बाटली कामावर घेऊन गेलो. तेथील माझ्या चीनी मित्रांकडून ते बी व्हिटामिन असल्याची खातरजमा केली आणि मगच ते घेण्यास सुरुवात केली.

Wednesday 7 December 2016

माझा सत्याग्रह

अमेरिकेत Knoxville शहरात काम करत होतो. हे शहर छोटे आहे. तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही. भारतातून जाताना आधी अन्य विमानतळावरून उतरून विमान बदलावे लागते.
मी परदेशांत काम करताना प्रत्येक पाच आठवड्यानंतर एक आठवडा सुट्टी घेऊन घरी येत होतो. असाच सुट्टीवर घरी जाण्यासाठी एकदा Knoxville विमानतळावर आलो. परंतु माझी फ्लाईट काही कारणाने त्यादिवशी उशिरा सुटणार होती. ही फ्लाईट overbooked ही होती. म्हणजेच विमानातील उपलब्ध जागांपेक्षा अधिक तिकिटे विकली गेली होती आणि अधिक प्रवाशांनी Check-in ही केले होते.
माझी फ्लाईट उशिरा सुटणार असल्याने मला पुढील विमानतळावरून मुंबईस जाणारे फ्लाईट मिळणे शक्य नव्हते. म्हणून एअरलाईन्सने माझे तिकीट रद्द करून दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटने मला जाण्यास सांगितले. मी माझे हॉटेल सोडले होते तसेच Taxi ने परत जाण्याचा/येण्याचा  खर्चही होता. मी विमानकंपनीकडे विमानतळावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये माझी एक दिवसासाठी (विमानकंपनीच्या खर्चाने) राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. सर्वसाधारणपणे विमान उशिरा निघाल्याने प्रवासी अडकल्यास विमानकंपन्या अशी व्यवस्था करतात. परंतु या कंपनीने माझी मागणी धुडकावून लावली. माझे परतीचे तिकीट असल्याने (मी एका आठवड्यात परत येणार होतो) माझे घर Knoxville मध्ये असल्याचा निष्कर्ष कंपनीने काढला होता आणि अशा परिस्थितीत हॉटेलची व्यवस्था कंपनी करत नसल्याचे मला सांगितले गेले. वारंवार विनंती करूनही माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
मग मी त्यांना भारतीय सत्याग्रह काय असतो हे दाखविण्याचे ठरविले. Knoxville हे छोटे विमानतळ असल्याने रात्री ९:३० नंतर ते बंद होते हे मला माहित होते. मी विमानकंपनीच्या काउंटरसमोरच माझ्या बॅगेतील सतरंजी पसरली आणि रात्री तेथेच झोपण्याचा माझा मनोदय जाहीर केला. विमानकंपनीच्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी रात्री विमानतळ बंद होण्याच्या वेळी सिक्युरिटी आला. मी हॉटेल सोडलेले असल्याने विमानतळावर झोपण्याशिवाय मला पर्याय नसल्याचे त्याला सांगितले. त्याने काय चाव्या फिरविल्या माहित नाही, पण थोड्याच वेळात विमानकंपनीचे कर्मचारी माझ्याकडे आले आणि त्यांनी माझी व्यवस्था तेथील पंचतारांकित हॉटेलमध्ये केली असल्याचे सांगितले. शिवाय मला झालेल्या त्रासाबद्दल विमानकंपनीने दिलगिरी व्यक्त करून दीडशे डॉलरचे कूपनही दिले.हे कुपन मी पुढील प्रवासात मला वापरता येणार होते.
अशाप्रकारे माझा सत्याग्रह यशस्वी झाला.

Tuesday 6 December 2016

चीनी कोंबडी

१९९७ ची गोष्ट. मी चीनमध्ये एका प्रोजेक्टवर होतो. माझ्या दुबईतील कंपनीतून मला फोन आला की आणखी एक भारतीय त्या प्रोजेक्टवर येत आहे. त्याला settle होण्यास मी मदत करावी. मी आनंदाने ती जबाबदारी स्वीकारली.
हा माझा सहकारी एका रविवारी दुपारी तेथे दाखल झाला. संध्याकाळी आम्ही दोघांनी बाहेर जेवायला जाण्याचे ठरविले. जवळच एक मोठे इंडोनेशियन रेस्टॉरंट होते. तेथे आम्ही सर्व कन्सलटंट्स नेहमी जात होतो. तेथेच त्याला न्यायचे ठरविले.
पण आमचा हा सहकारी भलताच उतावळा निघाला. त्या इंडोनेशियन रेस्टॉरंटमध्ये जाण्याएवढाही त्याला धीर नव्हता. त्याला प्रवासातून आल्याने खूप भूक लागली होती. त्याने वाटेत रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा आग्रह धरला. त्या रेस्टॉरंटमध्ये कोणालाही भाषा कळणार नाही, Order देताना कठीण जाईल असे सांगूनही त्याला पटले नाही. जगात कोठेही 'चिकन' म्हटले की कळते यावर त्याचा विश्वास होता. त्याच्या आग्रहाने आम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये शिरलो.
या मित्राने अत्यंत आत्मविश्वासाने चिकनची ऑर्डर दिली. पण रेस्टॉरंट मालकाला 'चिकन' हा काय प्रकार आहे हे कळले नाही. माझ्या मित्राने हात फडफडवून 'कुकूच कू' म्हणून पाहिले तरी त्या रेस्टॉरंट मालकाला काही कळले नाही (प्रत्येक देशात प्राण्यांचे आवाज वेगळे ऐकू येतात !). आता काय करावे हा आम्हाला प्रश्न पडला. हा मित्र तर भुकेने कासावीस झाला होता.
रेस्टॉरंटमध्ये शिरताना आम्ही दाराशीच प्राण्यांचे पिंजरे पहिले होते. साप, नाग, मुंगुस, मोरापासून सर्व प्राणी त्या पिंजऱ्यांत होते. आपल्याला कोणत्याही प्राण्याची ऑर्डर द्यायची असल्यास पिंजऱ्यातील ते प्राणी शिजवून देतात. ही पद्धत चीनमध्ये सर्वत्र आहे. या प्राण्यांत कोंबडीही होती हे आमच्या चाणाक्ष नजरेने हेरले होते. आम्ही बाहेर जाऊन ती कोंबडी रेस्टॉरंटमालकाला दाखविली. पण आम्हाला पूर्ण कोंबडी नको तर अर्धीच हवी (आमच्या हॉटेल खोलीत फ्रीज नव्हता) हेही त्या मालकाला खुणेने सांगितले.
बराच वेळ वाट बघूनही चिकन येत नव्हती. हा मित्र भुकेने कासावीस झाला होता. तेवढ्यात मालकाचा मुलगा आला. तो शाळेत नववीत शिकत होता. त्याला शाळेत English हा विषय होता. त्याला English बोलण्याची संधी मिळावी म्हणून मालकाने मुद्दाम घरून बोलाविले होते. त्याच्या सहाय्याने आम्ही अन्य काही पदार्थांची ऑर्डर दिली आणि या मित्राची भूक थोडीफार शांत केली. बऱ्याच वेळाने आम्ही ऑर्डर दिलेली कोंबडी आली. संपूर्ण कोंबडी केवळ वाफवून दिली होती आणि त्यावर कोंबडीचे वाफवलेले डोके लावून आणली होती. या वेळपर्यंत आमची भूकही अन्य पदार्थांनी  आम्ही भागविली होती. ही वाफाविलेली कोंबडी आम्ही थोडी खाऊन बाकी तशीच ठेऊन तेथून निघालो. माझ्या या मित्राने परत कधीही अशा छोट्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा आग्रह धरला नाही.

मी आणि आगीचा बंब

अमेरिकेत भारतीय पद्धतीचे जेवण बनविताना धूर झाल्याने आगीची सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित होऊन आगीचे बंब आल्याच्या घटना आपण ऐकतो. मलाही त्या अनुभवातून एकदा जावे लागले.
मी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी काम करीत होतो. आम्हा सर्व Consultants ची राहण्याची व्यवस्था  कंपनीने एका हॉटेलमध्ये केली होती. हे Long Stay पद्धतीचे हॉटेल होते. म्हणजे या हॉटेलमध्ये स्वयंपाकघरही असते. असे हॉटेल साधारणपणे Weekly Rent किंवा Daily Rent वर मिळते. अमेरिकेतील हॉटेल्स लाकडी बांधकामाची असतात त्यामुळे त्यांना आगीचा धोका जास्त असतो. आमची कंपनी अमेरिकेतील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ होती.  या सर्व कारणांमुळे तेथे सुरक्षेचे नियम अत्यंत कडक होते. हॉटेलची अग्निशमन यंत्रणा Fire Station आणि police Station शी जोडलेली होती.
रविवार होता. सर्व अमेरिकन Consultants आपापल्या घरी गेले होते.  माझे स्वयंपाकाचे प्रयोग सुरु होते. मी भारतीय दुकानातून अळूच्या वडीचे लोंढे आणले होते. माझे अळूवड्या तळण्याचे काम जोरात सुरु होते. आणि अचानक Fire Alarm वाजू लागला. हॉटेलमधील सर्व पर्यटक जिन्याने खाली जाऊ लागले. पाठोपाठ दोन आगीचे बंब आणि काही पोलिसांच्या गाड्या हॉटेलच्या आवारात दाखल झाल्या. हा Fire Alarm माझ्या स्वयंपाकाच्या प्रयोगातूनच झालेल्या धुरामुळेच झाला आहे याची मला खात्री होती. मी खोलीच्या बाहेर आलो नाही, या परीस्ठीतीतून बाहेर कसे पडायचे याचा विचार सुरु झाला. आणि मी माझी Strategy ठरवली.
अपेक्षेप्रमाणे थोड्याच वेळात खोलीची बेल वाजली. समोर हॉटेलची मॅनेजर आणि अग्निशमन अधिकारी उभे होते. त्यांनी हा Fire Alarm माझ्या खोलीतून Activate झाल्याचे सांगितले आणि मी काय करत होतो याची चौकशी केली. मी अत्यंत निरागस चेहरा करून (तसा मी नाटक्याच ) त्यांना सांगितले की मी 'भारतीय पद्धतीने' स्वयंपाक करीत होतो. यातही मी 'भारतीय पद्धतीने' या शब्दांवर जोर दिला होता. अमेरिकेत वांशिक भेदभावाला स्थान नाही. त्या विरोधातील कायदे कडक आहेत याची मला कल्पना होती. त्यामुळे 'भारतीय पद्धतीने जेवण बनविण्यास' ते विरोध करू शकणार नाही असा अंदाज होता. हा माझा अंदाज खरा ठरला. तो अग्निशमन अधिकारी माझ्या उत्तराने गोंधळून गेला. मी नक्की कसा स्वयंपाक करतो आहे ते दाखविण्याची त्याने विनंती केली. मी काही वड्या तळून दाखविल्या. तो फक्त 'I can understand why the alarm got activated' एवढेच म्हणाला. मग मी संधी साधली. त्याला सांगितले की 'मी असाच स्वयंपाक नेहमी करणार आहे'. माझ्या alarm ची sensitivity कमी करण्याचीही विनंती केली. अन्यथा त्यालाच त्रास होण्याचीही शक्यता वर्तविली. तो अधिकारी आणि हॉटेल मॅनेजर माझीच क्षमा मागत निघून गेले.
दुसऱ्या दिवशी ही हकीकत सर्व कंपनीत पसरली. अमेरिकेत लोकांना हसण्यासाठी काहीतरी विनोद हवाच असतो. माझ्या कंपनीच्या पर्सोनेल मॅनेजरने मला बोलावून काय झाले ते समजावून घेतले. बराच वेळ तोही हसत बसला होता.
त्यानंतर धूर होवू नये म्हणून मी काळजी घेत होतो. म्हणूनच कदाचित परत असा प्रसंग आला नाही.

Monday 5 December 2016

व्हिसा

१९९७ सालच्या ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी एका मोठ्या अमेरिकन कंपनीच्या Hong Kong शाखेने बोलाविले. मी माझी अमेरिकेतील नोकरी सोडून चीनच्या दिशेने निघालो.
Hong Kong नुकतेच चीनी अमलाखाली आले होते. केवळ पंधरा दिवस झाले होते. मला Shenzhen या Hong Kong ला लागून असलेल्या चीनी शहरात जायचे होते. होंगकोंग हाच जवळचा विमानतळ होता. माझ्या कंपनीने मला चीनी व्हिसा दिला नव्हता. मी प्रथम Hong Kong मधील कंपनीच्या कार्यालयात यावे मगच चीनी व्हिसासाठी अर्ज केला जाईल असे त्या कंपनीच्या Hong Kong मधील प्रमुखाने सांगितले. Hong Kong साठी तीन महिन्यांचा On Arrival व्हिसा मिळेल असेही सांगितले.
मी Hong Kong ला व्हिसाच्या रांगेत उभा राहिल्यावर मी तीन महिन्यांसाठी व्हिसा मागितला. पण आता चीनी राजवटीत नियम बदलेले होते. भारतीयांना केवळ पंधरा दिवसांचा व्हिसा मिळत होता. मला तीन महिन्यांचा व्हिसा कशासाठी हवा आहे अशी चौकशी झाली. 'मला चीनमध्ये नोकरीसाठी जायचे आहे' असे सांगितल्यास व्हिसा न मिळण्याची शक्यता वाटली. मी 'Hong Kong मध्ये फिरण्यासाठी आलो आहे' असे सांगितले. त्यांनी मी कोठे राहणार हे विचारताच 'नातेवाईकांकडे' असे उत्तर दिले. त्यांना संशय आला. नातेवाईकांचे नाव विचारले. सुदैवाने त्या कंपनीचा प्रमुख भारतीय होता. त्याचे नाव सांगितले. त्याच्या घरी कोण कोण आहेत त्याची चौकशी केली. मी ठोकून दिले. मग त्याचा घराचा फोन नंबर विचारला. माझ्याकडे होता. तो घेऊन त्याच्या घरी चौकशी करतो असे त्यांनी सांगितले. आता मात्र माझी गाळण उडाली. तो माणूस Office मध्ये असणार आणि त्याच्या घरच्यांना माझे नावही माहित नसणार हे लक्षात आले. आता मला तेथून ते परत पाठविणार, आणि अमेरिकेतील चांगली नोकरी मी सोडून बसलो आहे याची जाणीव झाली. पण चेहऱ्यावरील आत्मविश्वास ढळू दिला नाही. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्या माणसाच्या घरी फोन लावण्याचा सुमारे एक तास प्रयत्न केला. पण तो कोणीच उचलला नाही. शेवटी त्यांनी माझा व्हिसा मंजूर केला आणि केवळ परमेश्वराच्या कृपेने मी बचावलो.

अमेरिकन जेवण

मी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीबरोबर अमेरिकेत काम करीत असताना तेथील प्रोजेक्ट मॅनेजरने आम्हा सर्व कंन्सल्टंटसना जेवायला घरी बोलाविले. तो गुरुवार होता. सकाळीच प्रोजेक्ट मॅनेजरने मी Veg आहे काय याची चौकशी केली. मी सर्वकाही खातो, कोठल्याही प्रकारचे मांस मला वर्ज्य नसल्याचे त्याला सांगितले.
Image result for dinnerसंध्याकाळी काम संपवून आम्ही सर्व त्या मॅनेजरच्या घरी गेलो. त्याने त्याचे घर दाखविले. नंतर आम्ही जेवणाच्या टेबलावर आलो. घरात बूट घालून जेवण करणे हेच मला कसेतरी वाटत होते. जेवणाच्या आधी सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून प्रार्थना केली. ती ही अर्थात बूट घालूनच. नंतर मला प्रोजेक्ट मॅनेजरच्या पत्नीने सांगितले की तिने माझ्यासाठी veg जेवण केले आहे. मी परत सांगितले की मी सर्व प्रकारचे मांस आवडीने खातो. परंतु ते तिला पटले नाही. तिने कोठलेही non-veg पदार्थ मला वाढण्यास चक्क नकार दिला. मला बाटविण्याची तिची इच्छा नसल्याचे तिने आवर्जून सांगितले. 'आलिया भोगासी असावे सादर' म्हणत समोर दिसणाऱ्या चमचमीत पदार्थांकडे मी फक्त आशाळभूतपाने पहात राहिलो. माझ्यासाठी कोर्नसूप बनविले असल्याचे तिने सांगितले. नंतर त्या कोर्न सूप वरील झाकण उघडून त्यातून तिने मोठा चिकन लेग बाहेर काढला. केवळ कोर्नसूपला स्वाद येणार नाही म्हणून तिने तो स्वादासाठी त्यात टाकल्याचे स्पष्टीकरण दिले. परंतु तो मला देणार नसल्याचेही सांगितले. या प्रकाराने मी हतबुद्ध झालो. जर एखादा खरोखरच शाकाहारी माणूस तेथे असता तर त्याने काय केले असते हा विचार मनात आला. हा माझा अमेरिकन माणसाच्या घरी जेवणाचा (veg का non-veg??) पहिला अनुभव !