Pages

Monday 12 December 2016

चक्रीवादळ भाग 2

 1999 सालचा ऑगस्ट महिना. Hong Kong मध्ये चक्रीवादळ आले होते. माझे विमान त्या वादळातून सुखरूप उतरले, पण मागचे विमान अपघातग्रस्त झाले हे माझ्या मागच्या पोस्टवर टाकले आहे.
मी त्या वादळातून हॉटेलवर पोचलो. दमलो होतो. बातम्या न बघताच झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी कंपनीत कामाला जायचे होते. सुट्टीवरून आल्याने मधल्या काळात काय काम झाले हेही जाणून घ्यायचे होते. मी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यास निघालो. मी मेट्रोने जात असे. मेट्रोचे भूमिगत स्टेशन मी रहात असलेल्या हॉटेलच्या खालीच होते. मेट्रोत फारशी गर्दी नव्हती. मी कंपनीत पोचलो. बराच वेळ झाला तरी कंपनीत मी एकटाच होतो. ते एका मोठ्या वीज कंपनीचे वेअरहाउस होते. तरी त्यात सिक्युरिटीशिवाय एकाही माणूस आलेला नव्हता. मला आश्चर्य वाटले. माझ्या सुट्टीच्या काळात काय काम झाले आहे ते समजल्याशिवाय मला माझ्या कामाला हात घालता येत नव्हता.
मग वेळ घालविण्यासाठी इंटरनेटवर बातम्या पाहू लागलो. ते Hong Kong च्या इतिहासातील सर्वात मोठे चक्रीवादळ असून दहा नम्बरचा धोक्याचा इशारा दिला आहे असे समजले. मात्र हा दहा नम्बरचा इशारा हे काय प्रकरण आहे ते कळले नाही. लहान असताना रेडिओवर 'मच्छीमारांसाठी इशारा' म्हणून असे सहा नंबर, सात नंबरचे बावटे लावल्याचे सांगत असत. पण त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काही संबंध असेल असे वाटले नव्हते. Hong Kong च्या त्या प्रोजेक्टमधील माझ्या टीममधील भारतीय वंशाच्या सहकाऱ्याला फोन लावला. त्याने या दहा नंबर इशाऱ्याचा अर्थ सांगितला. वादळाच्या तीव्रतेचे रेटिंग एक ते दहा असे केलेले असते. दहा नम्बरचा इशारा म्हणजे सर्वात धोकादायक वादळ. आठ ते दहा नंबरचा इशारा असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडायचे नसते. या वेळी तुम्ही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर पडून अपघात झाल्यास विमाकंपन्या भरपाई देत नाहीत. म्हणूनच आमच्या कंपनीत कोणीही कामावर आलेले नव्हते. आश्चर्य म्हणजे सार्वजनिक वाहतूक (मेट्रो, बसेस) चालू होती. मी कंपनीत आलोच होतो तर संध्याकाळपर्यंत थांबण्याचे ठरविले. कंपनीचे कॅन्टीन चालू होते.
संध्याकाळी घरी गेल्यावर बातम्या पाहू लागलो. या चक्रीवादळाचे केंद्र आता Hong Kong वर आले होते. घराबाहेर न पडण्याचे इशारे दिले जात होते. दुसऱ्या दिवशी हीच परिस्थिती कायम होती. त्या वादळात चक्रीवादळाचे केंद्र Hong Kong वर जवळपास चोवीस तास स्थिरावलेले होते. एकाच ठिकाणी वादळाचे केंद्र स्थिरावणे ही सहसा न घडणारी घटना होती.
मग माझ्यातील साहसीवृत्ती जागृत झाली. समुद्रकिनाऱ्यावर खूप मोठ्या लाटा येत असल्याचे TV वर दाखवीत होते. काही साहसी वीर ते बघण्यास गेल्याचेही दाखवीत होते. Hong Kong च्या चौपाटीजवळ मेट्रो स्टेशनही होते. मी माझ्या मित्रमंडळीना फोन करून माझा इरादा सांगितला आणि माझ्याबरोबर येण्यास कोण तराय आहे काय याची विचारणा केली. पण कोणीही तयार झाले नाही. मग मी माझाही बेत रद्द केला.
चक्रीवादळ हॉटेलच्या खोलीबाहेर घोंघावत होते. मी तेविसाव्या मजल्यावर रहात होतो. रस्त्यावरील कचरा वाऱ्याबरोबर उडत माझ्या खिडकीसमोर येत होता.
मी हॉटेल बाहेर पडून वादळाचा अनुभव घ्यायचे ठरविले. असा अनुभव मुंबईत कसा मिळणार? चाक्रीवादालासाम्बंधी एक इशारा वारंवार दिला जात होता. चक्रीवादळाचे केंद्र Hong Kong वर आहे. त्यामुळे काही काळ वादळ शमल्यासारखे वाटेल, वारा पूर्णपणे पडेल, पण थोड्याच वेळात वर विरुद्ध दिशेने जोरात वाहू लागेल. या गोष्टीचा प्रत्यय हॉटेलबाहेर पडल्यावर आला. हॉटेलबाहेरील रस्त्याची वाताहात झाली होती, अनेक झाडे पडली होती, रस्त्यावरील दुकानांच्या पाट्या खाली पडल्या होत्या. तेथे दुकानांच्या पाट्या रस्त्याला आडव्या लावतात (आपल्याकडे रस्त्याला समांतर असतात). त्यामुळे त्या डोक्यावर पडण्याचा धोका वाटत होता म्हणून रस्त्यावर जास्त न रेंगाळता हॉटेलमध्ये परत आलो.
दुसऱ्या दिवशी वादळ शमले. जनजीवन पूर्ववत झाले. माझ्या गाठीला एक अविस्मरणीय अनुभव आला.

No comments:

Post a Comment