Pages

Monday 5 December 2016

व्हिसा

१९९७ सालच्या ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी एका मोठ्या अमेरिकन कंपनीच्या Hong Kong शाखेने बोलाविले. मी माझी अमेरिकेतील नोकरी सोडून चीनच्या दिशेने निघालो.
Hong Kong नुकतेच चीनी अमलाखाली आले होते. केवळ पंधरा दिवस झाले होते. मला Shenzhen या Hong Kong ला लागून असलेल्या चीनी शहरात जायचे होते. होंगकोंग हाच जवळचा विमानतळ होता. माझ्या कंपनीने मला चीनी व्हिसा दिला नव्हता. मी प्रथम Hong Kong मधील कंपनीच्या कार्यालयात यावे मगच चीनी व्हिसासाठी अर्ज केला जाईल असे त्या कंपनीच्या Hong Kong मधील प्रमुखाने सांगितले. Hong Kong साठी तीन महिन्यांचा On Arrival व्हिसा मिळेल असेही सांगितले.
मी Hong Kong ला व्हिसाच्या रांगेत उभा राहिल्यावर मी तीन महिन्यांसाठी व्हिसा मागितला. पण आता चीनी राजवटीत नियम बदलेले होते. भारतीयांना केवळ पंधरा दिवसांचा व्हिसा मिळत होता. मला तीन महिन्यांचा व्हिसा कशासाठी हवा आहे अशी चौकशी झाली. 'मला चीनमध्ये नोकरीसाठी जायचे आहे' असे सांगितल्यास व्हिसा न मिळण्याची शक्यता वाटली. मी 'Hong Kong मध्ये फिरण्यासाठी आलो आहे' असे सांगितले. त्यांनी मी कोठे राहणार हे विचारताच 'नातेवाईकांकडे' असे उत्तर दिले. त्यांना संशय आला. नातेवाईकांचे नाव विचारले. सुदैवाने त्या कंपनीचा प्रमुख भारतीय होता. त्याचे नाव सांगितले. त्याच्या घरी कोण कोण आहेत त्याची चौकशी केली. मी ठोकून दिले. मग त्याचा घराचा फोन नंबर विचारला. माझ्याकडे होता. तो घेऊन त्याच्या घरी चौकशी करतो असे त्यांनी सांगितले. आता मात्र माझी गाळण उडाली. तो माणूस Office मध्ये असणार आणि त्याच्या घरच्यांना माझे नावही माहित नसणार हे लक्षात आले. आता मला तेथून ते परत पाठविणार, आणि अमेरिकेतील चांगली नोकरी मी सोडून बसलो आहे याची जाणीव झाली. पण चेहऱ्यावरील आत्मविश्वास ढळू दिला नाही. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्या माणसाच्या घरी फोन लावण्याचा सुमारे एक तास प्रयत्न केला. पण तो कोणीच उचलला नाही. शेवटी त्यांनी माझा व्हिसा मंजूर केला आणि केवळ परमेश्वराच्या कृपेने मी बचावलो.

No comments:

Post a Comment