Pages

Friday 9 December 2016

चक्रीवादळ भाग १

1999सालच्या ऑगस्ट महिन्यातील गोष्ट. मी Hong Kong मध्ये काम करीत होतो. Hong Kong चा नवा विमानतळ सुरु होऊन पाच-सहा महिने झाले होते. हा विमानतळ डोंगराच्या कुशीत आहे. त्यामुळे तेथे वारे खूप वहातात आणि त्यांची दिशाही बदलत असते.
मी भारतात कुटुंबियांना भेटण्यासाठी आलो होतो आणि परतीच्या प्रवासास मुंबईहून निघालो होतो. आमच्या कंपनीचे प्रमुख मला मुंबई विमानतळावर भेटले.त्यांचे आई-वडील मुंबईत होते, त्यांना भेटून  तेही त्याच फ्लाईटने जात होते. पण आमची बसण्याची जागा एकमेकांपासून दूर होती.
आमचे विमान प्रथम बँकोकला थांबून नंतर Hing Kong ला जाणार होते. बँकोक विमानातळावरच आम्हाला समजले की Hong Kong येथे मोठे चक्रीवादळ आले असून त्यामुळे आमचे उड्डाण उशिराने होईल. आम्हाला काही तास तेथे थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर आम्ही Hong Kong ला रवाना झालो.
मी तसा झोपाळूच. विमान आकाशात झेपावण्याआधीच मी झोपावालेला असतो आणि विमान जमिनीवर उतरल्यावर जो हलकासा धक्का बसतो त्यानेच परत जागा होतो. तसाच त्याही दिवशी मी गाढ झोपून गेलो. झोपेतच मला मी एखाद्या हिंदोळ्यावर झुलतो आहे असा भास होऊ लागला. विमान खाली उतरून परत आकाशात झेपावते आहे असेही लक्षात आले. डोळे उघडून पाहता विमान वादळात अडकून बोटीसारखे गदागदा हलत आहे हे लक्षात आले. वैमानिक विमानतळावर विमान उतरविण्याचा परत परत प्रयत्न करीत होता, पण वादळामुळे त्याला ते शक्य होत नव्हते हे ही लक्षात आले. विमानात अत्यंत तणावपूर्ण वातावरण होते. मी एकंदरीत अंदाज घेतला आणि विमान उतरण्यास अजून काही वेळ लागेल हे ओळखून परत निद्रेच्या अधीन झालो. थोड्या वेळात हलक्याश्या धक्क्याने जाग आली. विमान उतरविण्यात आमचा वैमानिक यशस्वी झाला होता. सर्व प्रवाशांनी टाळ्या वाजविल्या. माझ्या बाजूला बसलेल्या प्रवाशाने विमान कसे वादळात अडकले होते हे मला सांगितले आणि मी कसा गाढ झोपलो होतो याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. मी त्याला सांगितले की 'विमान वादळात अडकले होते ते मला कळले होते, पण सर्व काही वैमानिकाच्या हातात होते, मी काहीच करू शकत नव्हतो म्हणून मी परत शांतपणे झोपून गेलो'. तो प्रवासी माझ्याकडे वेड्यासारखा पाहू लागला.
आम्ही विमानतळावर उतरलो आणि लगेचच विमानातळावरील वीज गेली. सुमारे अर्धा तास आम्ही बॅग
पट्ट्याजवळ वीज येण्याची वाट बघत उभे होतो. विमानातळाबाहेर पडताना आगीचे बंब आणि रुग्णवाहिकांचा ताफा विमानतळाजाताना पहिला. नंतर कळले की आमच्या मागून येणारे (आमच्या नंतर तीन मिनिटांनी उतरलेले)  विमान उतरताना त्याचा पंख जमिनीला लागल्याने तुटला आणि ते विमान वरची बाजू खाली अशा स्थितीत उतरले. या अपघातात एका महिलेचे निधन झाल्याचेही समजले. Hong Kong च्या नव्या विमानतळावरील तो पहिला अपघात. मी हॉटेलला पोचल्याबरोबर घरी फोन केला होता (तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता), त्यामुळे नंतर TV वर बातमी बघूनही घरच्याना चिंता वाटली नाही.
अपघात संदर्भ : https://aviation-safety.net/database/record.php?id=19990822-0
अपघात व्हिदिओ

No comments:

Post a Comment