Pages

Tuesday 6 December 2016

मी आणि आगीचा बंब

अमेरिकेत भारतीय पद्धतीचे जेवण बनविताना धूर झाल्याने आगीची सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित होऊन आगीचे बंब आल्याच्या घटना आपण ऐकतो. मलाही त्या अनुभवातून एकदा जावे लागले.
मी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी काम करीत होतो. आम्हा सर्व Consultants ची राहण्याची व्यवस्था  कंपनीने एका हॉटेलमध्ये केली होती. हे Long Stay पद्धतीचे हॉटेल होते. म्हणजे या हॉटेलमध्ये स्वयंपाकघरही असते. असे हॉटेल साधारणपणे Weekly Rent किंवा Daily Rent वर मिळते. अमेरिकेतील हॉटेल्स लाकडी बांधकामाची असतात त्यामुळे त्यांना आगीचा धोका जास्त असतो. आमची कंपनी अमेरिकेतील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ होती.  या सर्व कारणांमुळे तेथे सुरक्षेचे नियम अत्यंत कडक होते. हॉटेलची अग्निशमन यंत्रणा Fire Station आणि police Station शी जोडलेली होती.
रविवार होता. सर्व अमेरिकन Consultants आपापल्या घरी गेले होते.  माझे स्वयंपाकाचे प्रयोग सुरु होते. मी भारतीय दुकानातून अळूच्या वडीचे लोंढे आणले होते. माझे अळूवड्या तळण्याचे काम जोरात सुरु होते. आणि अचानक Fire Alarm वाजू लागला. हॉटेलमधील सर्व पर्यटक जिन्याने खाली जाऊ लागले. पाठोपाठ दोन आगीचे बंब आणि काही पोलिसांच्या गाड्या हॉटेलच्या आवारात दाखल झाल्या. हा Fire Alarm माझ्या स्वयंपाकाच्या प्रयोगातूनच झालेल्या धुरामुळेच झाला आहे याची मला खात्री होती. मी खोलीच्या बाहेर आलो नाही, या परीस्ठीतीतून बाहेर कसे पडायचे याचा विचार सुरु झाला. आणि मी माझी Strategy ठरवली.
अपेक्षेप्रमाणे थोड्याच वेळात खोलीची बेल वाजली. समोर हॉटेलची मॅनेजर आणि अग्निशमन अधिकारी उभे होते. त्यांनी हा Fire Alarm माझ्या खोलीतून Activate झाल्याचे सांगितले आणि मी काय करत होतो याची चौकशी केली. मी अत्यंत निरागस चेहरा करून (तसा मी नाटक्याच ) त्यांना सांगितले की मी 'भारतीय पद्धतीने' स्वयंपाक करीत होतो. यातही मी 'भारतीय पद्धतीने' या शब्दांवर जोर दिला होता. अमेरिकेत वांशिक भेदभावाला स्थान नाही. त्या विरोधातील कायदे कडक आहेत याची मला कल्पना होती. त्यामुळे 'भारतीय पद्धतीने जेवण बनविण्यास' ते विरोध करू शकणार नाही असा अंदाज होता. हा माझा अंदाज खरा ठरला. तो अग्निशमन अधिकारी माझ्या उत्तराने गोंधळून गेला. मी नक्की कसा स्वयंपाक करतो आहे ते दाखविण्याची त्याने विनंती केली. मी काही वड्या तळून दाखविल्या. तो फक्त 'I can understand why the alarm got activated' एवढेच म्हणाला. मग मी संधी साधली. त्याला सांगितले की 'मी असाच स्वयंपाक नेहमी करणार आहे'. माझ्या alarm ची sensitivity कमी करण्याचीही विनंती केली. अन्यथा त्यालाच त्रास होण्याचीही शक्यता वर्तविली. तो अधिकारी आणि हॉटेल मॅनेजर माझीच क्षमा मागत निघून गेले.
दुसऱ्या दिवशी ही हकीकत सर्व कंपनीत पसरली. अमेरिकेत लोकांना हसण्यासाठी काहीतरी विनोद हवाच असतो. माझ्या कंपनीच्या पर्सोनेल मॅनेजरने मला बोलावून काय झाले ते समजावून घेतले. बराच वेळ तोही हसत बसला होता.
त्यानंतर धूर होवू नये म्हणून मी काळजी घेत होतो. म्हणूनच कदाचित परत असा प्रसंग आला नाही.

No comments:

Post a Comment