Pages

Thursday 19 April 2018

काळवीट शिकार : अमेरिकेतील

सध्या सलमानखानचे काळवीट शिकार प्रकरण गाजते आहे. त्यामुळे आठवण झाली.
Image result for काळवीटमी १९९७ साली अमेरिकेत असताना प्रोजेक्टवरील एक अमेरिकन माझा जवळचा मित्र झाला होता. एक दिवस त्याने मला सांगितले की त्या सप्ताहाखेरीस तो काळविटाच्या शिकारीसाठी जाणार आहे. त्याने मलाही या शिकारीत सामील होण्यासाठी आमंत्रण दिले.
अधिक चौकशी करता कळले की अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणावर हरीणे आहेत. ती पिकांचे नुकसान करतात. तेथील बरेच रस्ते जंगलातून गेले आहेत. रात्रीच्या वेळी अंधारात (हमरस्त्यांवर दिवे नसतात) ही हरणे रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी रहातात. रस्त्याने कार आल्यास त्या कारच्या दिव्याच्या प्रकाशात रस्ता ओलांडण्यासाठी धावत सुटतात. अशा हरीणांवर वेगात येणारी कार आदळल्यास त्या कराचे मोठे नुकसान होते. प्राणहानीही होऊ शकते. त्यामुळे हरिणांची संख्या मर्यादित ठेवावी लागते. म्हणून दर वर्षी तेथील सरकार हरिणाच्या संख्येची मोजदाद करते आणि त्यानुसार किती हरिणे मारायची ते ठरविते. मग शिकारीसाठी अर्ज मागविले जातात आणि लॉटरीपद्धतीने प्रत्येकी फक्त एका हरिणाची शिकार करण्यासाठी परवाने दिले जातात. हे परवाने मिळविणे खर्चाचे तर असतेच परंतु लॉटरी पद्धतीमुळे परवाना मिळणे दैवावर अवलंबून असते. माझ्या या मित्राला दैववशात त्याच वर्षी हा परवाना मिळाला होता. त्याचे अनेक अमेरिकन मित्र त्याच्याबरोबर जाण्यास उत्सुक होते. परंतु मी अमेरिकेत नवा असल्याने आणि मी त्याचा जवळचा मित्र असल्याने तो मला आमंत्रित करीत होता.
मी त्याचे आभार मानून मला त्यात रस नसल्याचे सांगितले. तो आश्चर्यचकितच झाला. मला माझ्या डोळ्यासमोर प्राण्यांची अशी शिकार करणे आवडत नसल्याचे सांगितले. तो थोडा नाराज झाला. मग तो अन्य मित्रांबरोबर शिकारीला गेला.

Tuesday 3 April 2018

इतिहास शिकण्याचे महत्व

अमेरिकेनंतर मी कामासाठी भेट दिलेला देश म्हणजे दक्षिण कोरिया. १९९७ च्या जानेवारीत कोरियाच्या सर्वात मोठ्या कंपनीत SAP implement करण्यासाठी तशाच मोठ्या consulting firm बरोबर जाऊ लागलो.
आपण अमेरिकेचा इतिहास शालेय अभ्यासात शिकलेलो असतो. पण कोरीयासाम्बंधी  माहिती नव्हती. तेव्हा internet युग आले नसल्याने विदेशाबद्दल फारच कमी माहिती असे. चीनच्या लगत असलेला देश यामुळे तेथे अतिप्राचीन चीनी संस्कृतीचाच प्रभाव असेल असे वाटले होते. त्यामुळे तेथील प्रोजेक्ट मॅनेजरशी बोलताना 'मला चीनमध्ये जाऊन तेथील संस्कृती बघायची आहे' असे बोललो. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. मला का ते कळले नाही. पण आपण काहीतरी मोठी चूक केली आहे हे लक्षात आले. लगेच बाजारात जाऊन दक्षिण कोरियाच्या इतिहास आणि संस्कृती याबद्दलचे पुस्तक विकत घेतले आणि वाचून काढले. त्या पुस्तकातून कोरिया युद्ध, त्यात चीनचा सहभाग, त्यामुळे अत्यंत ताणले गेलेले द. कोरिया - चीन संबंध याची माहिती मिळाली. माझी काय चूक झाली ते ध्यानात आले.
या पुस्तकातून मला आणखीही बरीच उपयुक्त माहिती मिळाली. कोरियन युद्धात दक्षिण कोरिया युद्धात जवळपास हरली होती. उत्तर कोरियाने चीनच्या मदतीने द. कोरियाच्या सेनेला मागे ढकलले होते. फक्त एक बंदर द. कोरियाच्या ताब्यात होते. अशावेळी युनोचे शांतता पथक द. कोरियाच्या मदतीला धावून आले. त्यांनी उ. कोरिया-चीनची सेना मागे हटविली. या युनोच्या कारवाईत सोळा देशांनी सहभाग घेतला होता. त्यात (१९५५ साली - तेव्हा चीन आपला अत्यंत जवळचा मित्र होता) वैद्यकीय पथक भारताचे होते.
ही माहिती मिळाल्यावर मी माझ्या गप्पातून माझ्या कोरियन सहकाऱ्यांना ही माहिती देऊ लागलो. त्यांच्यासाठी ही नवी माहिती होती. त्यामुळे त्यांच्या मनात भारतीयांबद्दल आदर निर्माण झाला आणि मला त्याचा फायदा हा प्रोजेक्ट करताना मिळाला. कोरियन संस्कृती ही साडेतीन हजार वर्षे जुनी आहे. ही संस्कृती, त्यातील पौराणिक कथा (उदा. त्यांच्या कथेप्रमाणे डुक्करापासून माणूस झाला) इत्यादीबद्दलही मला माहिती मिळाली. मी गप्पातून ही माहिती सांगताच तर माझ्या कोरियन मित्रांना माझ्याबद्दल प्रेमाचे भरते आले.
मात्र कोरियन लिपी ही भारतीय पंडितांनी तयार केली आहे याची मला तेव्हा माहिती नव्हती. ही माहिती मला कोरीयाहून परत आल्यावर मिळाली. कोरियन लोकांना आपल्या लिपीचा खूप अभिमान आहे. ही लिपी चीनी लीपीहून (आणि जपानी लिपीहून : जपानने कोरियावर तीस वर्षे राज्य केले होते) वेगळी आणि प्रगत आहे असे ते मानतात. कोरियन राजाचे अयोध्येच्या राजकन्येशी काही हजार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ही राजकन्या आपल्याबरोबर काही पंडित घेऊन गेली. तेथील राजाच्या इच्छेखातर या पंडितांनी (बांबूच्या पडद्याच्या सावलीच्या आकृतीतून) लिपी तयार केली. ही लिपी बाराखडीत आहे. मला हे जर कोरियात जाण्यापूवी माहित असते तर मी ते अभिमानाने सांगू शकलो असतो आणि माझे माझ्या कोरियन सहकाऱ्यांबरोबरचे संबंध अधिक मैत्रीचे झाले असते.
यानंतर मी अनेक देशांत कामानिमित्ताने फिरलो. या देशांची संस्कृती, इतिहास यांचा अभ्यास करूनच तेथे गेलो.
मित्रानो, आपण शाळेत इतिहास शिकतो ते केवळ मार्क मिळविण्यासाठी नाही. त्याचा आयुष्यात उपयोग होतो. कोठल्याही नव्या देशात जाण्यापूर्वी तेथील इतिहास, संस्कृती, भूगोल याचा अभ्यास करून जा. एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी तुमच्या Technical ज्ञानाबरोबरच तुमच्या सहकारी मित्रांबरोबरचे मैत्रीचे बंध उपयुक्त ठरतात.