Pages

Friday, 20 October 2017

पत्ता शोधणे

पत्ता शोधणे ही एक कला आहे. विशेषत: नव्या देशांत कधी कधी हे फारच कठीण होते.
माझा होंग कोंग मधील पहिला दिवस. संध्याकाळच्या सुमारास मी माझ्या हॉटेलवर पोचलो. हॉटेल एका मेट्रो स्टेशनच्या वर होते. मी हॉटेलवर चेक इन केल्यावर संध्याकाळी आसपासचा परिसर पाहण्यास निघालो. हॉटेल Image result for royal park hotel hong kong mongkokमेट्रो स्टेशनच्या वरच असल्याने निवांत होतो. मेट्रो स्टेशनचे नाव लक्षात ठेवले. आता चिंता नव्हती.
चालत थोडा दूर गेलो. माझ्या कधी रस्ती लक्षात रहात नाहीत. परत हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो. रस्त्यावरील लोकांना स्टेशन कोठे आहे ते विचारले. पण अर्ध्या लोकांना इंग्रजी येतच नव्हते. ज्याना येत होते त्यांनी मला विचारले, 'कोणती लाईन?'. हे स्टेशन मेट्रोच्या दोन लाईन्सवर होते आणि दोन्ही स्टेशनमध्ये अंतर होते. मी गोंधळलो. पण सुदैवाने मला त्या लाईन चा रंग आठवला. मग पुढील प्रश्न आला 'कोणते एक्झिट'. हे स्टेशन लांबवर पसरले होते आणि जमिनीखाली अनेक रस्त्यांना छेद देत होते. त्यामुळे त्याची अनेक exits होती आणि ती निरनिराळ्या रस्त्यांवर उघडत होती. मुंबईशहरात राहणाऱ्या मला हे नवीनच होते. मला वाटले होते की फक्त स्टेशनचे नाव लक्षात ठेवले की पुरेसे आहे.
शेवटी माझ्या स्मरणशक्तीचा उपयोग करून मी माझे हॉटेल शोधून काढले.

Thursday, 5 October 2017

माझे अमेरिकेतील रक्तदान

१९८७ चा सुमार होता. मी अमेरिकेत जाऊन काही महिने लोटले होते. मी भारतात दर तीन-चार महिन्यांनी रक्तदान करीत असे. पण अमेरिकेत गेल्यावर केले नव्हते.
मी एका खूप मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होतो. एकदिवस तेथे रक्तदान शिबीर असल्याची नोटीस लागली. मला उत्साह आला. मी आता अमेरिकेतही रक्तदान करणार होतो. रक्तदानाच्या शिबिराचा दिवस उजाडला. मी सकाळचे माझे काम आटोपून रक्तदानाच्या ठिकाणी गेलो. तेथील रक्तदानाच्या आधीच्या सर्व formalities पूर्ण केल्या आणि माझा नंबर येण्याची वाट बघू लागलो. पण माझा नंबर आल्यावर मला रक्तदानाची परवानगी नाकारण्यात आली. मी काही महिन्यांपूर्वी भारतातून आल्याने ही परवानगी नाकारल्याचे मला सांगण्यात आले.
मी त्याना शांतपणे विचारले, 'मी भारतातून आलो असलो तरी माझ्या रक्ताचा रंग तुमच्यासारखा लालच आहे ना? काळा तर नाही ना?' माझ्या वाक्याने सर्व डॉक्टर्स हादरले. मी वंशभेदाकडे बोट दाखवीत होतो. अमेरिकेत वंशभेद हा फार मोठा गुन्हा समाजाला जातो. प्रत्येकजण मला समजाविण्याचा प्रयत्न करीत होता. रक्तदात्याला एक टी-शर्ट आणि काही भेटवस्तू देत होते. त्या भेटवस्तूही त्यांनी मला दिल्या. परंतु माझा रक्तदानाचा हक्क का नाकारला गेला हे कळल्याशिवाय मी मागे हटण्यास तयार नव्हतो. सर्व डॉक्टर्स त्यांच्याजवळ असलेल्या मोठ्या सूचनांच्या पुस्तकात काही शोधात होते. शेवटी त्यांना हवा तो संदर्भ मिळाला. 'मलेरिया असलेल्या भागात' गेल्या तीन वर्षात वास्तव्य केलेल्यास रक्तदानाची परवानगी नव्हती. भारत हा मलेरिया असलेल्या भागात समाविष्ट होत होता. संदर्भ मिळाल्यावर त्या सर्व डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील तणाव निवळला. मी त्याना मोठ्या संकटात टाकले होते, त्यातून त्यांची सुटका झाली होती.
अशाप्रकारे अमेरिकेतील लोकांच्या रक्तात माझे रक्त मिसळू शकले नाही.

Monday, 16 January 2017

माझी कार हरवते.....

अमेरिकेत मी Compaq Computers या नामांकित कंपनीत प्रोजेक्टवर होतो. ह्युस्टन शहरात या कंपनीचे मुख्य कार्यालय होते. कंपनीचे आवार म्हणजे गावच होते. तेथे दहा माजली दहा कार्यालयीन इमारती असून प्रत्येक दोन  इमारतीच्यामध्ये एक दहा मजली कार पार्किंग इमारत आहे. आणि या सर्व इमारती पहिल्या मजल्यावरून
एकमेकींशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी तेथे कार पार्क करताना दडपण आले होते. परत जाताना आपली कार मिळेल का नाही याची धास्ती होती. पार्किंग नंतर मी प्रथम बिल्डींगचा नंबर लक्षात ठेवला. नंतर कोठल्या मजल्यावर कार आहे तेही लिफ्टमध्ये शिरताना लक्षात ठेवले. संध्याकाळी कंपनी सुटल्यावर त्या बिल्डींगमध्ये कर घेण्यास गेलो. लिफ्टने त्या मजल्यावर आलो. पण माझी कार दिसेना. बिल्डींग नंबर आणि मजला परत परत चेक केला. तो तर बरोबर होता. प्रत्येक मजला प्रचंड मोठा होता. मी सगळीकडे जाऊन वेड्यासारखी कार शोधत होतो. शेवटी बिल्डीन्ग्च्या सिक्युरिटीकडे तक्रार देण्यास गेलो. त्याने विचारले 'कोठला मजला?' मी सांगितले '2'. त्याने परत विचारले '2 or L2?'. एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी लिफ्टमध्ये सकाळी शिरताना मजला पहिला होता, त्यावर L2 लिहिले होते. मी फक्त 2 लक्षात ठेवले. या इमारतीला जमिनीखाली मजले आहेत हे लक्षातच आले नव्हते. मी जमिनीखालील दुसऱ्या मजल्यावर माझी कार ठेवली होती आणि दुसऱ्या मजल्यावर शोधत होतो. L2 मजल्यावर माझी कार सुरक्षित होती. पण जवळपास एक तास मी दुसऱ्या मजल्यावर ती शोधात होतो. ही चूक अनेकांची होत असावी आणि तो सिक्युरिटी अनुभवी असावा म्हणूनच त्याने पहिल्या प्रश्नातच माझा गोंधळ दूर केला.

Thursday, 29 December 2016

वाईन चे कारंजे आणि नव्या सहस्त्रकाचे स्वागत

एक जानेवारी २००० : नव्या सहस्त्रकाची सुरुवात. सर्व जग या सहस्त्रकाच्या स्वागतासाठी सज्ज होते. पूर्वेकडील देशांत या सहस्त्रकाची सुरुवात होणार असल्याने अनेक पाश्चात्य देशातील नागरिकांनी पोर्वेकडील देशांकडे धाव घेतली होती. मी मात्र सुदैवाने माझ्या प्रोजेक्टसाठी पूर्वेकडील हॉंगकॉंग या देशातच होतो.
आम्ही तेथील एका पंचतारांकित हॉटेलात कंपनीच्या खर्चाने काही महिने राहत होतो. तेथील विद्युत पुरवठा कंपनीमध्ये SAP चालू करायचे होते आणि त्यासाठी मी तेथे गेलो होतो. एक जानेवारीलाच तेथे SAP ची सुरुवात होनार होती.
१९९९ चा ख्रिसमस चालू झाला. Hong Kong मध्ये पर्यटकांची गर्दी उसळली होती. प्रत्येक हॉटेल आपल्याकडे जास्तीतजास्त पर्यटक ओढण्याचा प्रयत्न करीत होते. आमच्या हॉटेलने छान शक्कल लढविली.
३१ डिसेंबरच्या रात्री पार्टीमध्ये हॉटेल समोरील कारंज्यात पाण्याऐवजी वाईन भरण्याची घोषणा केली. रात्री प्रत्येकाने वाईनच्या कारंज्यातून हवी तेवढी वाईन घेईन प्यावी. या पार्टीसाठी गलेलठ्ठ तिकीट आकारलेले होते. पण आम्हाला (अनेक महिने त्या हॉटेलमध्ये राहत असल्याने) त्या पार्टीचे मोफत पासेस दिले होते. आम्ही या वाईन कारंज्याचे स्वप्न रोज बघत होतो.
३१ दिसेम्बाराचा दिवस आला. एक तारखेला SAP चे Go-Live होते. संगणक प्रणालीत Y2K मुळे गोंधळ झाल्यास संपूर्ण Hong Kong चे लाईट जाण्याचा आणि परदेशी पर्यटकांच्या उत्साहावर पाणी पडण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्हाला  जोपर्यंत SAP पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तो पर्यंत कंपनीतच थांबण्यास सांगण्यात आले. आम्ही सतत घड्याळाकडे बघत होतो. रात्री बारा वाजता बाहेर काय धमाल चालू असेल याची केवळ कल्पना करीत होतो. हॉटेलमधील वाईनचे कारंजे आमच्या डोळ्यासमोर थुई थुई नाचत होते. SAP कार्यान्वित होण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास सकाळचे सात वाजले. आम्ही हॉटेलवर गेलो तेव्हा पार्टी संपली होती. युरोपमध्ये नव्या वर्षाची सुरुवात होत होती ते TV वर दाखवीत होते. TV बघत स्वत:चे समाधान करून घेतले.

Monday, 12 December 2016

चक्रीवादळ भाग 2

 1999 सालचा ऑगस्ट महिना. Hong Kong मध्ये चक्रीवादळ आले होते. माझे विमान त्या वादळातून सुखरूप उतरले, पण मागचे विमान अपघातग्रस्त झाले हे माझ्या मागच्या पोस्टवर टाकले आहे.
मी त्या वादळातून हॉटेलवर पोचलो. दमलो होतो. बातम्या न बघताच झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी कंपनीत कामाला जायचे होते. सुट्टीवरून आल्याने मधल्या काळात काय काम झाले हेही जाणून घ्यायचे होते. मी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यास निघालो. मी मेट्रोने जात असे. मेट्रोचे भूमिगत स्टेशन मी रहात असलेल्या हॉटेलच्या खालीच होते. मेट्रोत फारशी गर्दी नव्हती. मी कंपनीत पोचलो. बराच वेळ झाला तरी कंपनीत मी एकटाच होतो. ते एका मोठ्या वीज कंपनीचे वेअरहाउस होते. तरी त्यात सिक्युरिटीशिवाय एकाही माणूस आलेला नव्हता. मला आश्चर्य वाटले. माझ्या सुट्टीच्या काळात काय काम झाले आहे ते समजल्याशिवाय मला माझ्या कामाला हात घालता येत नव्हता.
मग वेळ घालविण्यासाठी इंटरनेटवर बातम्या पाहू लागलो. ते Hong Kong च्या इतिहासातील सर्वात मोठे चक्रीवादळ असून दहा नम्बरचा धोक्याचा इशारा दिला आहे असे समजले. मात्र हा दहा नम्बरचा इशारा हे काय प्रकरण आहे ते कळले नाही. लहान असताना रेडिओवर 'मच्छीमारांसाठी इशारा' म्हणून असे सहा नंबर, सात नंबरचे बावटे लावल्याचे सांगत असत. पण त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काही संबंध असेल असे वाटले नव्हते. Hong Kong च्या त्या प्रोजेक्टमधील माझ्या टीममधील भारतीय वंशाच्या सहकाऱ्याला फोन लावला. त्याने या दहा नंबर इशाऱ्याचा अर्थ सांगितला. वादळाच्या तीव्रतेचे रेटिंग एक ते दहा असे केलेले असते. दहा नम्बरचा इशारा म्हणजे सर्वात धोकादायक वादळ. आठ ते दहा नंबरचा इशारा असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडायचे नसते. या वेळी तुम्ही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून घराबाहेर पडून अपघात झाल्यास विमाकंपन्या भरपाई देत नाहीत. म्हणूनच आमच्या कंपनीत कोणीही कामावर आलेले नव्हते. आश्चर्य म्हणजे सार्वजनिक वाहतूक (मेट्रो, बसेस) चालू होती. मी कंपनीत आलोच होतो तर संध्याकाळपर्यंत थांबण्याचे ठरविले. कंपनीचे कॅन्टीन चालू होते.
संध्याकाळी घरी गेल्यावर बातम्या पाहू लागलो. या चक्रीवादळाचे केंद्र आता Hong Kong वर आले होते. घराबाहेर न पडण्याचे इशारे दिले जात होते. दुसऱ्या दिवशी हीच परिस्थिती कायम होती. त्या वादळात चक्रीवादळाचे केंद्र Hong Kong वर जवळपास चोवीस तास स्थिरावलेले होते. एकाच ठिकाणी वादळाचे केंद्र स्थिरावणे ही सहसा न घडणारी घटना होती.
मग माझ्यातील साहसीवृत्ती जागृत झाली. समुद्रकिनाऱ्यावर खूप मोठ्या लाटा येत असल्याचे TV वर दाखवीत होते. काही साहसी वीर ते बघण्यास गेल्याचेही दाखवीत होते. Hong Kong च्या चौपाटीजवळ मेट्रो स्टेशनही होते. मी माझ्या मित्रमंडळीना फोन करून माझा इरादा सांगितला आणि माझ्याबरोबर येण्यास कोण तराय आहे काय याची विचारणा केली. पण कोणीही तयार झाले नाही. मग मी माझाही बेत रद्द केला.
चक्रीवादळ हॉटेलच्या खोलीबाहेर घोंघावत होते. मी तेविसाव्या मजल्यावर रहात होतो. रस्त्यावरील कचरा वाऱ्याबरोबर उडत माझ्या खिडकीसमोर येत होता.
मी हॉटेल बाहेर पडून वादळाचा अनुभव घ्यायचे ठरविले. असा अनुभव मुंबईत कसा मिळणार? चाक्रीवादालासाम्बंधी एक इशारा वारंवार दिला जात होता. चक्रीवादळाचे केंद्र Hong Kong वर आहे. त्यामुळे काही काळ वादळ शमल्यासारखे वाटेल, वारा पूर्णपणे पडेल, पण थोड्याच वेळात वर विरुद्ध दिशेने जोरात वाहू लागेल. या गोष्टीचा प्रत्यय हॉटेलबाहेर पडल्यावर आला. हॉटेलबाहेरील रस्त्याची वाताहात झाली होती, अनेक झाडे पडली होती, रस्त्यावरील दुकानांच्या पाट्या खाली पडल्या होत्या. तेथे दुकानांच्या पाट्या रस्त्याला आडव्या लावतात (आपल्याकडे रस्त्याला समांतर असतात). त्यामुळे त्या डोक्यावर पडण्याचा धोका वाटत होता म्हणून रस्त्यावर जास्त न रेंगाळता हॉटेलमध्ये परत आलो.
दुसऱ्या दिवशी वादळ शमले. जनजीवन पूर्ववत झाले. माझ्या गाठीला एक अविस्मरणीय अनुभव आला.

Friday, 9 December 2016

चक्रीवादळ भाग १

1999सालच्या ऑगस्ट महिन्यातील गोष्ट. मी Hong Kong मध्ये काम करीत होतो. Hong Kong चा नवा विमानतळ सुरु होऊन पाच-सहा महिने झाले होते. हा विमानतळ डोंगराच्या कुशीत आहे. त्यामुळे तेथे वारे खूप वहातात आणि त्यांची दिशाही बदलत असते.
मी भारतात कुटुंबियांना भेटण्यासाठी आलो होतो आणि परतीच्या प्रवासास मुंबईहून निघालो होतो. आमच्या कंपनीचे प्रमुख मला मुंबई विमानतळावर भेटले.त्यांचे आई-वडील मुंबईत होते, त्यांना भेटून  तेही त्याच फ्लाईटने जात होते. पण आमची बसण्याची जागा एकमेकांपासून दूर होती.
आमचे विमान प्रथम बँकोकला थांबून नंतर Hing Kong ला जाणार होते. बँकोक विमानातळावरच आम्हाला समजले की Hong Kong येथे मोठे चक्रीवादळ आले असून त्यामुळे आमचे उड्डाण उशिराने होईल. आम्हाला काही तास तेथे थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर आम्ही Hong Kong ला रवाना झालो.
मी तसा झोपाळूच. विमान आकाशात झेपावण्याआधीच मी झोपावालेला असतो आणि विमान जमिनीवर उतरल्यावर जो हलकासा धक्का बसतो त्यानेच परत जागा होतो. तसाच त्याही दिवशी मी गाढ झोपून गेलो. झोपेतच मला मी एखाद्या हिंदोळ्यावर झुलतो आहे असा भास होऊ लागला. विमान खाली उतरून परत आकाशात झेपावते आहे असेही लक्षात आले. डोळे उघडून पाहता विमान वादळात अडकून बोटीसारखे गदागदा हलत आहे हे लक्षात आले. वैमानिक विमानतळावर विमान उतरविण्याचा परत परत प्रयत्न करीत होता, पण वादळामुळे त्याला ते शक्य होत नव्हते हे ही लक्षात आले. विमानात अत्यंत तणावपूर्ण वातावरण होते. मी एकंदरीत अंदाज घेतला आणि विमान उतरण्यास अजून काही वेळ लागेल हे ओळखून परत निद्रेच्या अधीन झालो. थोड्या वेळात हलक्याश्या धक्क्याने जाग आली. विमान उतरविण्यात आमचा वैमानिक यशस्वी झाला होता. सर्व प्रवाशांनी टाळ्या वाजविल्या. माझ्या बाजूला बसलेल्या प्रवाशाने विमान कसे वादळात अडकले होते हे मला सांगितले आणि मी कसा गाढ झोपलो होतो याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. मी त्याला सांगितले की 'विमान वादळात अडकले होते ते मला कळले होते, पण सर्व काही वैमानिकाच्या हातात होते, मी काहीच करू शकत नव्हतो म्हणून मी परत शांतपणे झोपून गेलो'. तो प्रवासी माझ्याकडे वेड्यासारखा पाहू लागला.
आम्ही विमानतळावर उतरलो आणि लगेचच विमानातळावरील वीज गेली. सुमारे अर्धा तास आम्ही बॅग
पट्ट्याजवळ वीज येण्याची वाट बघत उभे होतो. विमानातळाबाहेर पडताना आगीचे बंब आणि रुग्णवाहिकांचा ताफा विमानतळाजाताना पहिला. नंतर कळले की आमच्या मागून येणारे (आमच्या नंतर तीन मिनिटांनी उतरलेले)  विमान उतरताना त्याचा पंख जमिनीला लागल्याने तुटला आणि ते विमान वरची बाजू खाली अशा स्थितीत उतरले. या अपघातात एका महिलेचे निधन झाल्याचेही समजले. Hong Kong च्या नव्या विमानतळावरील तो पहिला अपघात. मी हॉटेलला पोचल्याबरोबर घरी फोन केला होता (तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता), त्यामुळे नंतर TV वर बातमी बघूनही घरच्याना चिंता वाटली नाही.
अपघात संदर्भ : https://aviation-safety.net/database/record.php?id=19990822-0
अपघात व्हिदिओ

मी आजारी पडतो

परदेशी भटकंती करीत काम करताना आरोग्य सांभाळणे हे महत्वाचे असते. जर आजारी पडलात तर तुमची काळजी घेणारे कोणीच नसते. तसेच संस्कृती दरी जाणवते. त्यातही तुम्ही इंग्रजी न समजणाऱ्या देशात असाल तर बघायलाच नको. मला याचा अनुभव आला.
मी माझ्या आरोग्याची अतीव काळजी घेत होतो. पण चीनमध्ये  शेंझान शहरात एका प्रोजेक्टवर असताना माझे तोंड आले. खरे तर 'तोंड येणे' ही माझी नेहमीची समस्या होती. यावरील उपायही मला माहित होता. बी व्हिटामिनची गोळी घेतल्यास तोंड येणे बरे होते. मी निश्चिंत होतो.
पण यावेळी मी चीनमध्ये होतो. चीनमध्ये पाश्चात्य औषधे वापरत नाहीत. तेथे फक्त पारंपारिक चीनी औषधेच मिळतात. Hong Kong अनेक वर्षे ब्रिटीश अधिपत्याखाली असूनही तेथेही हीच परिस्थिती आहे. आपण मात्र आपल्या आयुर्वेदाला विसरलो आणि अॅलोपथीला जवळ केले.
चीनी पारंपारिक औषधे म्हणजे प्राण्यांच्या अवयवापासून बनविलेली औषधे. चीनमध्ये बहुतांश लोकांना इंग्रजी भाषेचा गंधही नसतो. त्यामुळे मला बी व्हिटामिन हवे आहे हे कसे सांगायचे हा प्रश्न होता. थोडा विचार करता यावर उपाय सापडला. मी एका अमेरिकन हॉटेलमध्ये रहात होतो. तेथील बहुतांश  पर्यटक परदेशी होते. हॉटेलमॅनेजरला थोडेफार इंग्रजी येत होते. त्याच्या सहाय्याने बी व्हिटामिनच्या गोळ्या आणण्याचे ठरविले.
रविवार होता. मी त्या हॉटेलमॅनेजरशी बोललो. मला काय आणि कशासाठी हवे आहे ते त्याला समजावून सांगण्यासाठी सुमारे पाऊण तास लागला. नंतर त्याने माझ्याबरोबर एका हॉटेल कर्मचाऱ्याला पाठविले. मला काय हवे आहे ते त्याला त्या मॅनेजरने मँडरीनमध्ये (चीनी भाषा) समजावून दिले. त्या कर्मचाऱ्याला इंग्रजीचा गंधही नव्हता. या कर्मचाऱ्याने मला एका चीनी औषधांच्या दुकानात नेले. अनेक औषधींच्या वासाने दुकान भरले होते (आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या दवाखान्यासारखे). दुकानातील माणसाने मला एक औषधी गोळ्यांची बाटली दिली.  मला B व्हिटामिन हवे होते. बाटलीवर किमान इंग्रजीतील 'B' दिसावे अशी माझी रास्त अपेक्षा होती. पण त्यावर एकाही अक्षर इंग्रजीत नव्हते. पण मला त्यावर एक माशाचे चित्र दिसले. त्यावरून मी निष्कर्ष काढला की ते औषध 'बी व्हिटामिन' नसून 'इ व्हिटामिन' आहे. ती औषधाची बाटली मी हॉटेलला गेल्यावर हॉटेलमॅनेजरला दाखविली आणि परत मला काय हवे आहे ते सांगितले. ती बाटली खरोखर ई व्हिटामिनचीच होती. मला त्याच हॉटेल कर्मचाऱ्याबरोबर त्याने परत पाठविले. त्या दुकानदाराने आता मला बाटली बदलून दिली. त्या बाटलीवरही कोठले इंग्रजी अक्षर नव्हते. आता माझा विश्वास उडाला होता. मी ती बाटली तशीच ठेवली. दुसऱ्या दिवशी ती बाटली कामावर घेऊन गेलो. तेथील माझ्या चीनी मित्रांकडून ते बी व्हिटामिन असल्याची खातरजमा केली आणि मगच ते घेण्यास सुरुवात केली.