Pages

Thursday 5 October 2017

माझे अमेरिकेतील रक्तदान

१९८७ चा सुमार होता. मी अमेरिकेत जाऊन काही महिने लोटले होते. मी भारतात दर तीन-चार महिन्यांनी रक्तदान करीत असे. पण अमेरिकेत गेल्यावर केले नव्हते.
मी एका खूप मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होतो. एकदिवस तेथे रक्तदान शिबीर असल्याची नोटीस लागली. मला उत्साह आला. मी आता अमेरिकेतही रक्तदान करणार होतो. रक्तदानाच्या शिबिराचा दिवस उजाडला. मी सकाळचे माझे काम आटोपून रक्तदानाच्या ठिकाणी गेलो. तेथील रक्तदानाच्या आधीच्या सर्व formalities पूर्ण केल्या आणि माझा नंबर येण्याची वाट बघू लागलो. पण माझा नंबर आल्यावर मला रक्तदानाची परवानगी नाकारण्यात आली. मी काही महिन्यांपूर्वी भारतातून आल्याने ही परवानगी नाकारल्याचे मला सांगण्यात आले.
मी त्याना शांतपणे विचारले, 'मी भारतातून आलो असलो तरी माझ्या रक्ताचा रंग तुमच्यासारखा लालच आहे ना? काळा तर नाही ना?' माझ्या वाक्याने सर्व डॉक्टर्स हादरले. मी वंशभेदाकडे बोट दाखवीत होतो. अमेरिकेत वंशभेद हा फार मोठा गुन्हा समाजाला जातो. प्रत्येकजण मला समजाविण्याचा प्रयत्न करीत होता. रक्तदात्याला एक टी-शर्ट आणि काही भेटवस्तू देत होते. त्या भेटवस्तूही त्यांनी मला दिल्या. परंतु माझा रक्तदानाचा हक्क का नाकारला गेला हे कळल्याशिवाय मी मागे हटण्यास तयार नव्हतो. सर्व डॉक्टर्स त्यांच्याजवळ असलेल्या मोठ्या सूचनांच्या पुस्तकात काही शोधात होते. शेवटी त्यांना हवा तो संदर्भ मिळाला. 'मलेरिया असलेल्या भागात' गेल्या तीन वर्षात वास्तव्य केलेल्यास रक्तदानाची परवानगी नव्हती. भारत हा मलेरिया असलेल्या भागात समाविष्ट होत होता. संदर्भ मिळाल्यावर त्या सर्व डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील तणाव निवळला. मी त्याना मोठ्या संकटात टाकले होते, त्यातून त्यांची सुटका झाली होती.
अशाप्रकारे अमेरिकेतील लोकांच्या रक्तात माझे रक्त मिसळू शकले नाही.

No comments:

Post a Comment